काजू बी खरेदीसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करणार; हलकर्णी येथील ३६ एकर जागेला शासनाची मंजुरी
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत काजू प्रक्रिया प्रकल्पांची तात्काळ उभारणी करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश पणन मंत्री तथा काजू परिषदेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिले आहेत. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित ‘काजू परिषद’ संचालक मंडळाच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे आदेश दिले.
काजू बी खरेदीसाठी पोर्टल विकसित होणार
बैठकीदरम्यान मंत्री जयकुमार रावल यांनी काजू परिषदेने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले काजू बी खरेदी करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी येथील ३६ एकर जागा खरेदीस शासनाने मंजुरी दिली असून, त्या जागेच्या हस्तांतराची कारवाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
महसूल विभागाशी समन्वय अन् गोदामांची उभारणी
काजू प्रक्रिया प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून महसूल विभागाशी समन्वय साधत तातडीने पुढील कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय काजू बी साठवणुकीसाठी सुसज्ज गोदामे (Godowns) उभारण्याबाबतचा कृती आराखडा (Action Plan) तात्काळ तयार करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
“काजू बी बाहेर राज्यांत जाण्याऐवजी त्यावर आपल्या राज्यातच प्रक्रिया होऊन मूल्यवर्धन (Value Addition) झाले पाहिजे. त्यामधून काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, याच मुख्य उद्दिष्टातून काजू परिषदेचे काम सुरू आहे.” — जयकुमार रावल, पणन मंत्री तथा अध्यक्ष, काजू परिषद
प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अशोक करंजकर, संचालक मंडळ सदस्य डॉ. परशराम पाटील, रूपेश बेलोसे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 25-08-2026














