रखडलेल्या कामांना निधीची प्रतीक्षा; जलजीवनच्या कामांसाठी १२५ कोटींची गरज
रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना निधीची प्रतीक्षा कायम असतानाच शासनाकडून जिल्हा परिषदेला ११ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, निधी येऊन कित्येक दिवस उलटून गेले तरी अद्याप त्याचे वितरण झालेले नाही. परिणामी, कामांना अपेक्षित गती मिळालेली नसून ठेकेदार निधीच्या प्रतीक्षेत असल्याने अनेक कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
८९९ योजनांच्या कामांना ब्रेक; ठेकेदार आर्थिक अडचणीत
जलजीवन मिशनअंतर्गत कामे पूर्ण करण्यासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, केवळ ११ कोटी रुपयेच जिल्हा परिषदेला मिळाले आहेत. त्यातील काही निधीचे वाटप झाले असून काही निधीचे वाटप अद्याप प्रलंबित आहे.
जिल्ह्यात १ हजार ४२८ कामे मंजूर असून त्यापैकी ५१३ कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, निधीअभावी ८९९ योजनांच्या कामांना ब्रेक लागला होता. आता निधी प्राप्त होऊनही त्याचे वितरण वेळेत न झाल्याने साहित्य, मजुरी आणि इतर खर्च भागवणे कठीण झाल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात ५६८ गावे ‘हर घर जल’ घोषित
ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हा जलजीवन मिशनचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५६८ गावे ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली असून, ३ लाख ८८ हजार १६५ कुटुंबांना घरगुती नळजोडणी देण्यात आली आहे.
“जलजीवन मिशनअंतर्गत १२५ कोटींची मागणी केली होती; मात्र जिल्हा परिषदेला ११ कोटींचा निधी आलेला आहे. निधी वाटपाचे काम ऑनलाईन सुरू झाले आहे. निधी मिळाल्यानंतर जलजीवनच्या कामांना पुन्हा गती मिळेल.” — अभिजित कांबळे, प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा जि.प. रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:35 25-08-2026














