Nitin Gadkari: “आता जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला संधी दिली पाहिजे”; नितीन गडकरींचे मोठं विधान

नागपुरातील कार्यक्रमात व्यक्त केले मनोगत; स्वतःच्या बेशिस्त जीवनशैली आणि फिटनेस प्रवासावरही स्पष्ट भाष्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना “मी आता जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला संधी दिली पाहिजे” असे मोठे विधान केले आहे. नागपुरातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक – पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’त आदिवासी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे मनोगत व्यक्त केले. गडकरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

नवीन पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याचे संकेत

आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना गडकरी म्हणाले, “मी काही प्रेरणास्त्रोत नाही. ज्या वेळी काम करू शकलो, तेव्हा केले. आता माझा कामातील सहभाग कमी झाला आहे. मी सर्वांना सांगितले आहे की, नव्या पिढीच्या हाती काम दिले पाहिजे. नवीन लोक आले आहेत आणि जुने त्यांना मार्गदर्शन करत आहेत.” मिळाले आयुष्य उत्तम जगले पाहिजे आणि इतरांच्या आयुष्यात उजेड आणण्यासाठी मदत करणे हेच खरे सामाजिक व राष्ट्रीय कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

समोसा खाऊन झोपण्यापासून ते अडीच तास योगासनांपर्यंतचा प्रवास

तरुणपणातील स्वतःच्या बेशिस्त जीवनशैलीचा किस्सा सांगताना ते म्हणाले, “पूर्वी पक्षाचे काम करताना रात्री समोसा खाऊन झोपून जायचो. पण कोविडनंतर मी आरोग्याबाबत काळजी घेऊ लागलो आहे. आता मी दररोज सकाळी अडीच तास प्राणायाम आणि व्यायाम करतो.”

आरोग्याचे महत्त्व पटवून देताना ते पुढे म्हणाले, “जर तब्येत बिघडली, तर सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञानाचा काय उपयोग? अचानक हार्ट अटॅक आला तर सोबत काहीही येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने रोज सकाळी उठून किमान अर्धा तास व्यायाम केलाच पाहिजे.”

माजी अध्यक्षांची रंजक आठवण

आपल्या सुरुवातीच्या राजकीय दिवसांची आठवण सांगताना त्यांनी एक रंजक किस्सा शेअर केला. “माझे आयुष्य पूर्वी खूप बेशिस्त होते. त्याकाळी आमच्याकडे एका सहकाऱ्याकडे ॲम्बेसिडर गाडी होती, म्हणून आम्ही त्याला पक्षाचा अध्यक्ष बनवले होते; जेणेकरून पक्षाचे वरिष्ठ नेते विमानतळावर आल्यावर त्यांच्या वाहतुकीची सोय व्हावी. मी स्वतः सुरुवातीला लूनावरून आणि नंतर एकाच स्कूटरवरून चौघे जण प्रवास करायचो,” असेही गडकरी यांनी मिश्किलपणे सांगितले.

एकही आदिवासी गाव अंधारात राहणार नाही

संस्थेच्या कार्याचा गौरव करताना गडकरी म्हणाले की, हे कार्य भविष्यात इतके मोठे होईल की राज्यातील एकही आदिवासी गाव अंधारात राहणार नाही. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि गुणांचा विकास करून गरिबांच्या व वंचित घटकांच्या आयुष्यात उजेड आणण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 25-08-2026