रात्र जागून काढण्याची वेळ; गणपती सण अंधारात साजरा करावा लागण्याची भीती
लांजा तालुक्यातील माचाळ आणि पालू या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरणच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.
आरोग्य समस्या अन् उपकरणांचे नुकसान
रात्रीच्या वेळी वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. विजेच्या लपंडावामुळे स्थानिक व्यावसायिक, पिठाची गिरणी व लघुउद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच कमी-जास्त दाबामुळे (High/Low Voltage) फ्रिज, टीव्ही, पंखे यांसारखी महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होत आहेत.
मोबाईल नेटवर्कही ठप्प
गावात नेटवर्कसाठी उभारलेला टॉवर वीज नसल्याने बंद पडतो, ज्यामुळे नागरिकांचा संपर्कही तुटत आहे. दरवर्षी जून ते नोव्हेंबर या काळात विजेच्या या लहरीपणाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतो.
गणपती सणापूर्वी सुधारणा करण्याची मागणी
गणपती उत्सव तोंडावर आला असून महावितरणने तत्पूर्वीच वीज व्यवस्थेत सुधारणा करावी; अन्यथा यंदाचा गणपती सण अंधारात साजरा करावा लागेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने देऊन बोळवण केली जात असल्याचा आरोप करत लवकरात लवकर समस्या सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 25-08-2026














