रेल्वेच्या कामाचा अनुभव असलेल्या ‘मॅकॅफेरी’ कंपनीकडे जबाबदारी; ‘एयर डोम’ तंत्रज्ञानाचा होणार वापर
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अतिशय महत्त्वाचा असलेला आंबा घाट लवकरच पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. घाटातील दरड कोसळलेल्या आणि खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम आगामी एका आठवड्यात नव्या जोमाने सुरू करण्यात येणार आहे. माती परीक्षणानंतर आता रेल्वेच्या कामाचा दांडगा अनुभव असलेल्या ‘मॅकॅफेरी’ या नामांकित कंपनीकडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, कामाची गती पावसाच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे.
५ मीटर उंचीची भक्कम भिंत उभारणार
घाटातील ज्या भागाची माती खचली होती, तेथील नमुने गोळा करून तज्ज्ञांकडून तांत्रिक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. या भागाची पाहणी केली असता, वर ५ मीटर मातीचा थर असून खाली मजबूत कातळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरक्षेची पूर्ण काळजी घेत थेट कातळापर्यंत सुमारे ५ मीटर उंचीची भक्कम भिंत उभारली जाणार आहे.
‘एयर डोम’ तंत्रज्ञानाने भविष्यातील धोका टळणार
या दुरुस्तीसाठी अत्यंत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यात ‘एयर डोम’चा अवलंब केला जाईल. छत्रीच्या आकारासारख्या असणाऱ्या या विशिष्ट डिझाइनमुळे पावसाचे पाणी संबंधित भागात न मुरता थेट व्हॅलीमध्ये (दरी) वाहून जाण्यास मदत होईल, ज्यामुळे भविष्यात दरड कोसळण्याचा धोका टळणार आहे.
वाहनचालकांची प्रतीक्षा लवकरच संपणार
सध्या दुरुस्तीच्या कामाच्या नियोजनाची अंतिम तयारी सुरू असून, पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हा मार्ग सुरळीत झाल्यानंतर वाहतूक अधिक गतिमान होऊन प्रवाशांचा प्रवास त्रास वाचणार आहे. पावसाने विश्रांती दिल्यास निर्धारित वेळेत काम पूर्ण करून घाट लवकरात लवकर वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 25-08-2026














