पीठासीन अधिकारी शिल्पा सुर्वे यांनी सुरक्षेबाबत दिले आदेश; रस्ते दुरुस्ती, मोकाट जनावरे आणि नामकरणाच्या ठरावांना मंजुरी
रत्नागिरी नगर परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत (Ratnagiri Municipal Council Meeting) सफाई व उद्यान विभागातील कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत प्रमुखतेने मांडण्यात आला. सुमारे २५ दिवसांपूर्वी झाडी कापताना उद्यान विभागाचे कामगार काशिनाथ गोताड यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता, तर काही कामगार फांद्या छाटताना पडून जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी तातडीने सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
सुरक्षा साधने पुरवण्याची नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची ग्वाही
समाजकल्याण समिती सभापती विजय खेडेकर आणि नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधत कामगारांना गमबूट, हँडग्लोझ आणि हेल्मेट यांसारखी सुरक्षा उपकरणे पुरवण्याची मागणी केली. यावर पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी ही मागणी तत्काळ मान्य करत कामगारांना तातडीने सुरक्षा सुविधा पुरवल्या जातील आणि त्यांचा वापर सक्तीचा केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच सर्पदंशाने मृत झालेल्या कामगाराच्या वारसाला कंत्राटी कामगार म्हणून समाविष्ट करून घेणे व विमा मदत मिळवून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती व बंद पथदीप सुरू करण्याचे आदेश
आगामी गणेशोत्सवाच्या दृष्टीने शहरातील सर्व खड्डे बुजवण्यात यावेत, बंद पथदीप तत्काळ सुरू करण्यात यावेत आणि मोकाट गुरांचा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पीठासीन अधिकाऱ्यांनी दिले. पकडलेली गुरे सांभाळण्यासाठी दोन गोशाळा पुढे आल्या असून कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे कामही हाती घेण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. याशिवाय घरगुती गॅस जोडणीसाठी किंवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
विविध विकास कामे व महत्वपूर्ण विषयांना मंजुरी
सभेत शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाल्यांवर भेदभावरहित कडक कारवाई करण्याचे नगरसेवक राजू तोडणकर व नितीन जाधव यांनी स्पष्ट केले. शिवाजीनगर येथील बसस्टॉपला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव देण्याची मागणी नगरसेवक अभिजित दुडये यांनी केली. याशिवाय नगर बाल संरक्षण समितीवर नगरसेविका सुप्रिया कसाळ यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेच्या प्रारंभी नवीन नियमानुसार ६ कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ गायले गेले तसेच दिवंगत कामगार काशिनाथ गोताड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:21 26-08-2026














