Ratnagiri Investment Summit 2026: रत्नागिरी जिल्ह्यात २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक! उद्योग व पर्यटनाला मिळणार नवी दिशा

रत्नागिरी गुंतवणूक करार परिषदेत १०० कोटींच्या पंचतारांकित हॉटेलसह नवीन प्रकल्पांवर स्वाक्षरी; १० ते १२ हजार स्थानिकांना रोजगाराची संधी

रत्नागिरी: रत्नागिरी गुंतवणूक करार परिषदेच्या माध्यमातून कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती दिली आहे. ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ मध्ये तब्बल २ हजार १५९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार यशस्वीरीत्या पार पडले. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या १०० कोटी रुपयांच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह अनेक मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा समावेश आहे.

रत्नागिरी गुंतवणूक करार: एक्सप्रेस आणि महिंद्रा ग्रुपची पर्यटन क्षेत्रात मोठी गुंतवणूक

जिल्हा गुंतवणूक परिषदेत पर्यटन आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला बळ देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये एक्सप्रेस ग्रुपच्या १०० कोटींच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. एमआयडीसीच्या जागेत उभारले जाणारे हे पंचतारांकित हॉटेल रत्नागिरी विमानतळापासून २ किमी, शहरापासून ३ किमी आणि समुद्रापासून अवघ्या १ किमी अंतरावर असणार आहे.

दुसरीकडे, जयगड येथे आनंद महिंद्रा यांच्या ‘महिंद्रा ग्रुप’च्या पंचतारांकित हॉटेलचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून हे हॉटेल लवकरच उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. या पर्यटन प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील आदरातिथ्य क्षेत्राला मोठी संजीवनी मिळणार आहे.

रत्नागिरी विमानतळ आणि १० ते १२ हजार नवीन रोजगार

यावेळी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी विमानतळाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ‘एटीआर’ (ATR) प्रवासी विमान उड्डाण घेईल.

Arihant 2

तसेच, जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी येत्या ७, ८ आणि ९ तारखेला स्टील उद्योगाचा मार्ग मोकळा होत आहे. या प्रकल्पामुळे किमान १० ते १२ हजार स्थानिकांना थेट रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याशिवाय निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे नव्या प्रदूषणमुक्त एमआयडीसी उभारल्या जात आहेत.

पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा संकल्प

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेऊन केलेले हे २,१५९ कोटींचे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण केले जातील आणि पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प पूर्ण केला जाईल.

‘मिलाप’ ॲप आणि ‘मैत्री’ पोर्टलद्वारे पारदर्शक सेवा

उद्योग सुलभतेसाठी एमआयडीसीची जागा मिळवण्यासाठी ‘मिलाप’ (Milap) ॲप सुरू करण्यात आले आहे. या ॲपवर सोमवारी वैध अर्ज केल्यास पुढच्या सोमवारी घरबसल्या थेट ‘ऑफर लेटर’ प्राप्त होईल. तसेच ‘मैत्री’ (Maitri) पोर्टलवर अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत सर्व परवानग्या आणि दाखले मिळणे बंधनकारक असून, उशीर झाल्यास तक्रार आयुक्तांकडे जाऊन पुढील ८ दिवसांत मंजुरी दिली जाईल.

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये १,८३७ गुंतवणूक करारांद्वारे ८२,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, १,५५,३८९ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्येही अशा परिषदांचे आयोजन केले जाणार असल्याचे ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 31-08-2026