राजापूर बॉक्साईट प्रकल्प: नाणार परिसरातील जनसुनावणी रद्द!

स्थानिकांच्या विरोधानंतर ७ सप्टेंबरची जनसुनावणी स्थगित

नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरात होऊ घातलेल्या बॉक्साईट खनिज उत्खनन प्रकल्पाची ७ सप्टेंबर रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्यात येईल, अशी ठाम ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली. स्थानिक जनतेच्या तीव्र विरोधाची दखल घेत रविवारी सागवे येथील नारायण गणेश कुलकर्णी विद्यानिकेतन हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित सर्वपक्षीय प्रकल्पविरोधी संघर्ष मेळाव्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

स्थानिक आमदारांसह सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट

या मेळाव्याला राजापूरचे आमदार किरण सामंत, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, तालुकाप्रमुख दीपक नागले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, ॲड. शशिकांत सुतार यांसह परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी, बागायदार आणि मच्छीमार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात ॲड. शशिकांत सुतार यांनी प्रकल्पाच्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले. नाणारचे माजी सरपंच ओंकार प्रभुदेसाई आणि मजीद भाटकर यांनीही प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवत स्थानिक शेतकरी व मच्छीमार एकत्र असल्याचे स्पष्ट केले.

राजापूर बॉक्साईट प्रकल्प विरोधात सरकार जनतेसोबत

Rotary School

जनतेच्या भावनांचा आदर करत ना. उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, स्थानिक आमदार किरण सामंत यांचा या प्रकल्पाला विरोध असून शासनही जनतेच्या पाठीशी उभे आहे. कंपनीच्या मालकांशी बोलणी झाली असून त्यांनाही आता या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात स्वारस्य उरलेले नाही. त्यामुळे जबरदस्तीने कोणताही प्रकल्प लादला जाणार नाही. याच वेळी त्यांनी कोकणात सुमारे २००० कोटींचे पर्यावरणपूरक उद्योग आणले जातील, असे सांगतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कधीही बंद होणार नसल्याचे आश्वासन दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 31-08-2026