श्री रत्नागिरीच्या राजाचे जल्लोषात स्वागत: बॉम्बे हूपर शिवानी धोपावकर यांच्या हुलाहूप कसरतींनी रत्नागिरीकर भारावले

ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि भव्य मिरवणुकीने मारुती मंदिर परिसर दुमदुमला

रत्नागिरीच्या प्रसिद्ध ‘श्री रत्नागिरीच्या राजा’चे भव्य आगमन मिरवणुकीत मोठ्या उत्साहात पार पडले. ढोल-ताशांचा कडकडाट, डीजेचा ठेका आणि फटाक्यांच्या भव्य आतषबाजीत गणेशभक्तांनी बाप्पाचे जोरदार स्वागत केले. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या ‘बॉम्बे हूपर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवानी धोपावकर, ज्यांच्या नेत्रदीपक हुलाहूप कसरतींनी रत्नागिरीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

साळवी स्टॉप ते मारुती मंदिर असा रंगला आगमन सोहळा

मारुती मंदिर सर्कल येथे प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या श्री रत्नागिरीच्या राजाच्या आगमन मिरवणुकीला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास साळवी स्टॉप येथून सुरुवात झाली. बाप्पाच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारो भाविक रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान ठीकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर काही ठिकाणी भाविकांनी बाप्पावर पुष्पवृष्टी करून गणरायाचे दर्शन घेतले. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणेशभक्तांना या सोहळ्यात अधिक उत्साहाने सहभागी होता आले.

श्री रत्नागिरीच्या राजाचे जल्लोषात स्वागत करत पालकमंत्री उदय सामंत मिरवणुकीत सहभागी

Aayurzil

या भव्य आगमन सोहळ्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्री रत्नागिरीच्या राजाचे दर्शन घेतले आणि मिरवणुकीत सहभाग नोंदवला. बाप्पाच्या आगमनामुळे मारुती मंदिर आणि संपूर्ण शहर परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणूक सुरळीत पार पडावी आणि वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 31-08-2026