ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण आठल्ये यांचे निधन

१९७१ च्या भारत-पाक युद्धात बजावली होती महत्त्वपूर्ण सेवा

रत्नागिरी तालुक्यातील खानू येथील ज्येष्ठ पत्रकार आणि माजी नौसैनिक अरुण कृष्णानाथ आठल्ये (वय ७८) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने खानू आणि रत्नागिरी तालुक्यातील वृत्तपत्र क्षेत्रात व सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे असा मोठा परिवार आहे.

१९७१ च्या भारत-पाक युद्धात बजावली होती महत्त्वपूर्ण सेवा

अरुण आठल्ये यांनी देशसेवेचे व्रत अंगीकारत भारतीय नौदलात प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. १९७१ च्या ऐतिहासिक भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. नौदलातून सन्मानाने निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही काळ मर्चंट नेव्हीमध्येही आपली सेवा दिली. सैनिकी शिस्त आणि देशप्रेमाचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला.

Shanti 4

लष्करी सेवेनंतर अरुण आठल्ये यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी खानू गावचे सरपंचपद भूषवत ग्रामविकासात महत्त्वाचे योगदान दिले. याशिवाय विविध दैनिक आणि साप्ताहिकांमधून मुक्त पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी स्थानिक नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील समस्यांना सातत्याने वाचा फोडली. त्यांच्या पत्रकारितेतील आणि सामाजिक सेवेतील योगदानाची आठवण नेहमी ठेवली जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 31-08-2026