मांजरे बुडबुड्याचे पाणी परिसरात दुर्घटना
संगमेश्वर-आबलोली-जाकादेवी मार्गावरील मांजरे बुडबुड्याचे पाणी येथे एसटी बस आणि ॲक्टिव्हा दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. २८ ऑगस्ट रोजी दुपारी घडलेल्या या दुर्घटनेप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात रत्नागिरी डेपोच्या एसटी बसचालकाविरुद्ध हयगयीने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कुटुंबाचा प्रवास ठरला दुर्दैवी
मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेश अनंत चव्हाण (वय १८, रा. राई रांजेवाडी, ता. रत्नागिरी) हा तरुण आपल्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून (MH 46 BG 8149) वडील अनंत तुकाराम चव्हाण (वय ६०) आणि आई रुपाली अनंत चव्हाण (वय ५६) यांना घेऊन राई ते काजुर्ली असा प्रवास करत होता. दुचाकी मांजरे बुडबुड्याचे पाणी परिसरात पोहोचली असता समोरून रत्नागिरी एसटी डेपोची बस (MH 40 N 9870) वेगाने येत होती.
बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना
एसटी बसचालक पुंडलिक शिवाजी केंद्रे (वय ३५, मूळ रा. केंद्रेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर; सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) याने एसटी बस हयगयीने, अविचाराने आणि वेगाने चालवून रस्त्याच्या उजव्या बाजूला आणून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून, दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात चालक पुंडलिक केंद्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 31-08-2026














