रत्नागिरी जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या एकाच दिवशी धाडी; लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त

खेड, गुहागर, चिपळूण आणि रत्नागिरी शहरात धडक कारवाई; चार जणांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत २८ ऑगस्ट रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका आणि जुगार अड्ड्यांवर जोरदार धाडी टाकण्यात आल्या. खेड, गुहागर, चिपळूण आणि रत्नागिरी शहर परिसरात पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपींकडून दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य असा एकूण लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सर्वांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खेडमध्ये दुचाकीसह मुद्देमाल जप्त; गुहागर आणि चिपळूणमध्येही कारवाई

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोटे दूरक्षेत्रांतर्गत मौजे खेड ते शिवतर रस्त्यावर दुपारी १.१५ च्या सुमारास टाकलेल्या छाप्यात प्रवीण गोविंद कोलगे (वय ५२, रा. भरणे नाका) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ८० हजार रुपयांची सुझुकी ज्युपिटर दुचाकी, २,००० रुपयांची रोकड व साहित्य असा ८२,०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत ‘पुणे बाजार’ मटका खेळवणाऱ्या निलेश दिनकर जाधव (वय २८, रा. शृंगारतळी) याच्याकडून १,७७५ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. चिपळूणमधील खेर्डी बाजारपेठेत देवकुमार शाम जुवळे (वय ४३, रा. गोवळकोट भोईवाडी) याला रात्री ८ वाजता रंगेहाथ पकडून १४,१५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ

रत्नागिरी शहरात क्रांतीनगर कमानीजवळील रावजी चहाच्या दुकानामागे कल्याण मटका चालवणाऱ्या सचिन रघुनाथ गुरव (वय ३७, रा. रसाळवाडी, रत्नागिरी) याच्याविरोधात कारवाई करत ९५० रुपयांची रोकड आणि साहित्य जप्त करण्यात आले. एकाच दिवशी जिल्हाभरात राबवलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जुगार आणि मटका व्यवसायांविरुद्धची ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र स्वरूपात सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 31-08-2026