Bappa.org पोर्टलवर नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन; चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची माहिती
चिपळूण: कोकणात घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला जागतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, कलावंत आणि विविध संस्थांनी पुढे येऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन चिपळूण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार, आपल्या गौरवशाली गणेशोत्सवाचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण करण्यासाठी युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्याच्या दृष्टीने Bappa.org या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
विविध घटकांसाठी नोंदणीची सुलभ प्रक्रिया कलावंतांसाठी नोंदणी प्रक्रिया: जर तुम्ही मूर्तिकार, चित्रकार, गायक, वादक किंवा ६४ कलांशी संबंधित कलावंत असाल, तर पोर्टलच्या उजव्या बाजूला खाली दिसणाऱ्या ‘क’ (कला) या गोल आयकॉनवर क्लिक करावे. आपली कला, कौशल्य आणि लोककलेची माहिती व फोटो/व्हिडिओ अपलोड करून शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळवता येईल.
सार्वजनिक मंडळे व संस्थांसाठी: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, निवासी सोसायट्या, ग्रामपंचायती व महिला बचत गटांनी पोर्टलवरील ‘क’ च्या वर असलेल्या मंडळ/संस्था आयकॉनवर क्लिक करून आपल्या मंडळाची व पर्यावरणपूरक उपक्रमांची नोंदणी पूर्ण करायची आहे.

घरोघरी बाप्पाची नोंदणी: सर्व नागरिकांनी Bappa.org वर जाऊन ‘Sign In’ करून मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करावे. त्यानंतर स्क्रीनवरील लाल प्लस (+) चिन्हावर क्लिक करून ‘वारसा’ निवडून योग्य तो पर्याय निवडावा. अचूक पत्ता निवडताना Region मध्ये ‘Change’ वर क्लिक करून Chiplun Municipal Council area हा पर्याय निवडून पिनकोड 415605 टाकावा, जेणेकरून नोंदणी थेट चिपळूण पालिकेकडे जमा होईल. फोटो/व्हिडिओ अपलोड व व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअरिंग
पर्यावरणपूरक बाप्पा व सजावटीचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करून फॉर्म सबमिट करावा. सबमिट झाल्यानंतर तयार झालेली लिंक कॉपी करून अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या गणेशोत्सवाला जागतिक वारसा मिळवून देण्यासाठी सर्वांनी या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.













