पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना महिलांचा उदंड प्रतिसाद; शासकीय योजनांचेही मार्गदर्शन
रत्नगिरी: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यात महिलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हा भव्य सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करणे आणि महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.
कलाकारांकडून उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी कलाकारांनी भाजप महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि संपूर्ण कार्यकारिणीच्या नेटक्या नियोजनाचे व कार्यक्षम नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. हजारो महिलांना एकत्रित आणून असा भव्य उत्सव साजरा करण्याची संकल्पना व तिची यशस्वी अंमलबजावणी अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला सक्षमीकरणासाठी योजनांची माहिती हा सोहळा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता महिला शक्तीच्या एकतेचे दर्शन घडवणारा ठरला. कार्यक्रमादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देऊन महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच सोहळा यशस्वी – वर्षाताई ढेकणे आयोजनाच्या यशाचे श्रेय देताना भाजप महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे यांनी सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित महिलांचे आभार मानले. “हा सोहळा केवळ एका व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे नसून भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि माता-भगिनींच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला आहे,” असे सांगत आगामी काळात पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचवून महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 03-09-2026














