तिकीट मशीनमध्ये कार्ड न स्वीकारल्याने अर्ध्या ऐवजी पूर्ण तिकीट घेण्याची सक्ती; तांत्रिक अडचण तातडीने सोडवण्याची मागणी
चिपळूण, रत्नागिरी: महिलांना एसटी प्रवासात सवलत मिळावी यासाठी देण्यात आलेल्या ‘एनसीएमसी कार्ड’च्या (NCMC Card) तांत्रिक अडचणींमुळे मंगळवारी दिवसभर महिला प्रवासी आणि एसटी वाहकांमध्ये वादाचे प्रसंग घडले. अनेक महिलांचे एनसीएमसी कार्ड वाहकांच्या तिकीट मशीनमध्ये जुळत नसल्याने त्यांना सवलतीच्या अर्ध्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत.
नवीन कार्ड काढलेल्या महिलांचे कार्ड मशीनमध्ये स्वीकारले जात नसल्याने सवलतीचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. महिलांकडे वैध कार्ड असूनही ते मशीनवर चालत नसल्याच्या कारणावरून काही वाहकांकडून पूर्ण तिकिटाची मागणी केली जात होती. यामुळे प्रवासादरम्यान महिला प्रवासी आणि वाहकांमध्ये खटके उडाले.
चिपळूण एसटी आगारात महिलांचा धडक मोर्चा
या त्रासाला कंटाळून काही महिलांनी मंगळवारी सायंकाळी चिपळूण एसटी आगारात थेट धडक देत आगार प्रशासनाला निवेदन सादर केले. एनसीएमसी कार्ड्सची तांत्रिक समस्या तातडीने दूर करावी आणि हे कार्ड मशीनला व्यवस्थित कनेक्ट होण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
समस्या सुटेपर्यंत अर्ध्या तिकिटाची सवलत देण्याची विनंती
जोपर्यंत या कार्डची प्रणाली पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत कार्डधारक महिलांना आधीप्रमाणेच अर्ध्या तिकिटाची सवलत देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावर एसटी प्रशासन तातडीने काय तोडगा काढते, याकडे महिला प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
या प्रसंगी सुरेखा कोळपे, दुर्गा भोजने, स्वाती शिंदे, शोभा पांढरे, अश्विनी लिमये, स्नेहल गुरव, सोनाली साळुंखे यांच्यासह सुनील गेल्ये उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 03-09-2026














