भरधाव कार अचानक विरुद्ध दिशेला सरकल्याने अपघात; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
राजापूर, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातिठा परिसरात दोन वाहनांची जोरदार समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमींना तातडीने उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयासह एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून गोव्याच्या दिशेने मुंबई-कल्याणकडे जाणारी ‘एमएच ०५ एफ व्ही ७२६९’ ही कार भरधाव वेगाने जात होती. गंगातिठा परिसरात ही गाडी आली असता अचानक नियंञण सुटून ती विरुद्ध दिशेला सरकली आणि समोरून गोव्याच्या दिशेने चाललेल्या ‘एमएच ४६ सीएच ९१९६’ या गाडीवर समोरासमोर जाऊन जोरात धडकली.
लहान मुलासह प्रवासी जखमी
या भीषण अपघातात दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांतून नेमके किती प्रवासी प्रवास करत होते याची अधिकृत संख्या समजू शकली नसली, तरी जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
राजापूर पोलिसांकडून तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने अपघातस्थळी व दोन्ही रुग्णालयांमध्ये दाखल झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, अपघाताची नोंद व पुढील कायदेशीर माहिती गोळा करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 03-09-2026














