विकासकामे, महसूल वसुली आणि पीएम आवास योजनेची पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘फिल्ड’वर उतरून काम करण्याचे निर्देश
रत्नागिरी: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त तथा रोल ऑब्झर्वर रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मतदान केंद्रे, ग्रामपंचायती, नगर परिषद आणि जिल्हा मुख्यालयाला भेट देऊन कामांची सविस्तर पाहणी केली.
कोकण विभागात ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४६ लाख मतदार असून सुमारे ७९ लाख मतदारांची पडताळणी अद्याप शिल्लक आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात १३ लाख मतदारांपैकी केवळ १.३१ लाख (१० टक्क्यांपेक्षा कमी) मतदार अनकलेक्टेड आहेत. मतदार यादीच्या डिजिटायझेशनमध्ये १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याने रुबल अगरवाल यांनी जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.
‘स्वीप’ अंतर्गत जनजागृती गतिमान करण्याचे निर्देश मतदार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध असलेला एक महिन्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व नगर परिषद स्तरावर ‘स्वीप’ (SVEEP) अंतर्गत जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ज्या नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांनी ‘नमुना ६’ भरून नाव नोंदवावे तसेच दुरुस्ती असल्यास संबंधित अर्ज सादर करावा. मतदारांनी अधिकृत संकेतस्थळावर नाव तपासून काही अडचणी असल्यास ईआरओ किंवा एईआरओ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
आदर्श शाळा व पीएम आवास योजनेची पाहणी दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्तांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील आदर्श शाळेला भेट देऊन तेथील उपक्रमांचे कौतुक केले व इतर शाळांनीही असाच आदर्श घ्यावा असे सांगितले. त्यानंतर घेतलेल्या महसूल आढावा बैठकीत ज्या भागात वसुली कमी आहे, तेथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कडक कारवाई करत वसुली वाढवण्याचे सक्त निर्देश दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 03-09-2026














