केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर आणि पक्ष फोडण्याच्या राजकारणावर कडक टीका
Sanjay Raut Statement Amit Shah Narendra Modi: “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुरुवातीच्या पाच वर्षांत अमित शाह दिल्लीच्या राजकारणात नव्हते. तोपर्यंत देशातील राजकीय वातावरण स्थिर होते, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत नव्हता आणि पक्ष फोडण्याचे राजकारणही सुरू झाले नव्हते. मात्र, अमित शाह दिल्लीत आले आणि देशाचे तसेच भाजपचे अधःपतन सुरू झाले. अमित शाह यांना दिल्लीत आणणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
कोल्हापूर येथे एका मुलाखतीदरम्यान राऊत यांनी विविध राजकीय किस्से सांगत केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.
‘अमित शाह हे मोदींच्या दृष्टीने काम का आदमी’: अमित शाह यांच्यावरच नेहमी टीका का करता? मोदींना सज्जन मानतात का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, “मी नरेंद्र मोदींना सज्जन मानत नाही. मोदी जेव्हा अमित शाहांशिवाय दिल्लीत राजकारण करत होते, तेव्हा परिस्थिती आत्तासारखी बिघडलेली नव्हती. आज न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण मिळवून त्यांना गुलाम बनवले जात आहे. पक्षांतराला प्रतिष्ठा दिली जात असून त्यासाठी सर्व केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे सर्व पहिल्या पाच वर्षांत नव्हते. अमित शाह दिल्लीत आल्यावरच या गोष्टी सुरू झाल्या, कारण मोदींच्या दृष्टीने शाह हे ‘काम का आदमी’ होते.”
२०१४ मधील सत्तास्थापनेचा किस्सा: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी घडून आलेल्या घडामोडींवर प्रकाश टाकत राऊत म्हणाले, “तेव्हाचे भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला एनडीएच्या घटक पक्षांची संमती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मला फोन केला होता. एनडीएमध्ये शिवसेना दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष होती. जेव्हा मी मोदींच्या स्वागताला गेलो, तेव्हा मोदी माझी वाट पाहत थांबले होते आणि ‘आता शिवसेना पाठिशी आल्याने मला धीर आला’ असे उद्गार त्यांनी काढले होते.”
‘मी आणि मनमोहन सिंग यांनीच इशारे दिले होते’: आपल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “भाजपच्या धोरणांना विरोध केल्यामुळेच मला अटक करण्यात आली होती. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, तेव्हाच मी विधान केले होते की, आजपासून देशाच्या लोकशाहीच्या अधोगतीला सुरुवात झाली आहे. त्या वेळी संपूर्ण देशात फक्त मी आणि डॉ. मनमोहन सिंग या दोघांनीच ही भूमिका मांडली होती.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 04-09-2026














