Mumbai Sawantwadi Express Train: मुंबई-सावंतवाडी नियमित एक्सप्रेस सेवेत दाखल; चाकरमान्यांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा; गणेशोत्सवात कोकणासाठी ३७० विशेष गाड्या चालवण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी

Mumbai Sawantwadi Express Train: कोकणवासीयांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नवीन नियमित (दैनिक) एक्सप्रेस ट्रेलचा गुरुवारी औपचारिक शुभारंभ करण्यात आला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या नव्या रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. या नव्या गाडीमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या शुभारंभप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या नव्या दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवेमुळे कोकणातील पर्यटन, रोजगार, उद्योग आणि दैनंदिन प्रवासाला मोठी चालना मिळणार आहे.

वेळापत्रक आणि गाडी क्रमांक

ही नवी रेल्वेसेवा आता दररोज प्रवाशांच्या सेवेत नियमितपणे धावणार आहे. गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस अशी ही ट्रेन धावेल.

गाडी क्रमांक १५०८७ (CSMT ते सावंतवाडी रोड): ही एक्सप्रेस दररोज रात्री ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक १५०८८ (सावंतवाडी रोड ते CSMT): परतीच्या प्रवासात ही गाडी दररोज सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता मुंबईतील CSMT स्थानकात पोहोचेल.

प्रवाशांच्या सोयीसाठी या एक्सप्रेसला मुख्य मार्गावरील सर्व महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांना मोठे गिफ्ट

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही गाडी नियमित सेवेत दाखल झाल्याने कोकणात जाणाऱ्या भाविक व चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर तब्बल ३७० विशेष गाड्या चालवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात तिकीट बुकिंगसाठी होणारी धावपळ कमी होणार असून कोकणातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगाचा होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 04-09-2026