सध्या राज्य ६६० बिलियन डॉलरवर पोहोचल्याची माहिती
बातमी:
Devendra Fadnavis Majha Infra Vision 1 Trillion Dollar Economy: महाराष्ट्र राज्य १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर असून, सध्याचा ८.८ टक्के विकासदर चांगला असला तरी राज्याला १० टक्क्यांहून अधिक विकासदराचा (डबल डिजिट) टप्पा ओलांडायचा आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र हे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणारे देशातील पहिलेच राज्य आहे. २०३० सालापर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकासदर वाढवण्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशामध्ये अनेक राज्ये १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत आहेत; मात्र आज या स्वप्नाच्या सर्वात जवळ केवळ महाराष्ट्र आहे, कारण राज्याची अर्थव्यवस्था सध्या ६६० बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. आपण जर शाश्वत विकास दर (Sustained Growth Rate) कायम ठेवला, तर २०३० पर्यंत आपण नक्कीच १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठू.
दोन अंकी (डबल डिजिट) विकासदराचे लक्ष्य: जागतिक घडामोडींवर भाष्य करताना फडणवीस पुढे म्हणाले की, जगातल्या अनेक प्रमुख अर्थव्यवस्था २ ते २.५ टक्क्यांनी विकसित होत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे तेलाचे संकट (Oil Crisis) आले असतानाही भारत ७.८ टक्क्यांनी आणि महाराष्ट्र ८.८ टक्क्यांनी विकास करत आहे. महाराष्ट्राचा नॉमिनल ग्रोथ रेट (Nominal Growth Rate) ११ टक्क्यांच्या जवळ असला तरी महागाई (Inflation) आणि परकीय चलन विनिमय दर (Exchange Rate) यांचा विचार करून ते संतुलित करावे लागते. त्यामुळे सध्या ८.८ टक्के हा चांगला विकासदर असला तरी आगामी काळात १० टक्क्यांहून अधिक विकासदर गाठण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील.
२०३० किंवा २०३१ पर्यंत स्वप्नपूर्ती: १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था गाठण्याच्या कालावधीबद्दल स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, जेव्हा या ध्येयाची घोषणा केली होती, तेव्हाच्या डॉलर-रुपया विनिमय दरानुसार २०२९ मध्येच हे ध्येय पूर्ण झाले असते. मात्र जागतिक तेलाच्या संकटामुळे एक्सचेंज रेटमध्ये मोठे बदल झाले आहेत. १ ट्रिलियन हे उद्दिष्ट डॉलर मूल्यावर आधारित असल्याने डॉलरचे मूल्य बदलल्यास ध्येयाचा कालावधी काहीसा पुढे जातो. तरीही २०३० पर्यंत किंवा फार तर २०३१ च्या सुरुवातीला महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे हे ऐतिहासिक स्वप्न निश्चितपणे पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:41 04-09-2026














