Devendra Fadnavis Delhi Politics Statement: “२०२९ पर्यंत मी महाराष्ट्रातच राहणार!”; दिल्लीच्या राजकारणातील प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

माझ्या जाण्याने काहींना प्रमोशन वाटेल, तर काहींना ‘बला टळली’ असे वाटेल; पक्षाध्यक्ष आणि नेते सांगतील तेव्हाच निर्णय – फडणवीस

Devendra Fadnavis Delhi Politics Statement: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या दिल्ली दौऱ्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाले होते. मात्र, गुरुवारी (३ सप्टेंबर) एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पुन्हा एकदा पूर्णविराम दिला आहे. “माझा पक्ष ठरवेल आणि माझे नेते ठरवतील त्या दिवशी मी नक्की दिल्लीला जाईन; पण आज तरी माझं स्पष्ट मत आहे की २०२९ पर्यंत मी दिल्लीत जाणार नाही,” अशी ठाम प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आपल्या दिल्ली प्रवेशाच्या चर्चांवर मिश्किल भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, “मला असं वाटतं की, खूप लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने वाटतं. त्यात माझे काही हितचिंतक आहेत, ज्यांना वाटतं की मी दिल्लीला गेलो तर माझं प्रमोशन होईल. तर दुसरीकडे काही लोकांना असं वाटतं की मी दिल्लीला गेलो तर त्यांच्या डोक्यावरची ‘बला’ टळेल! कोणाला चांगलं वाटो किंवा वाईट, २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील, हे मी तुम्हाला आजच सांगतो.”

दर दोन-तीन महिन्यांनी येणाऱ्या बातम्यांवर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, “मला राजकारण कळतं आणि माझा पक्षही कळतो. दर दोन-तीन महिन्यांनी जेव्हा कोणाकडे बातमी नसते किंवा कोणाला नवीन बातमी तयार करायची असते, तेव्हा ते मला दिल्लीला पाठवून देतात. मला त्याचा आनंदच आहे. पण अंतिम निर्णय पक्ष व वरिष्ठ नेत्यांचा असेल.”

महाराष्ट्राच्या विकासाचा मांडला ‘रोडमॅप’: या वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा आणि विकासाचा रोडमॅपही स्पष्ट केला. महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचले असून, सध्याचा ८.८ टक्के विकासदर चांगला असला तरी आगामी काळात राज्याला १० टक्क्यांहून अधिक विकासदराचा टप्पा ओलांडायचा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज अनेक राज्ये १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहत असली, तरी सध्या महाराष्ट्र ६६० बिलियन डॉलरवर पोहोचून या स्वप्नाच्या सर्वात जवळ आहे. शाश्वत विकास दर ठेवल्यास २०३० पर्यंत महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निश्चितपणे बनेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:41 04-09-2026