Guhagar ST Bus Reservation Full: गुहागर डेपोतून १७३ बसचे आरक्षण फुल्ल; गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचा उदंड प्रतिसाद

विरार, बोरिवली, भांडुप, चिंचवड, स्वारगेट मार्गांवर जादा बस सेवा; यंदा ४०० हून अधिक गाड्यांचे बुकिंग होण्याचा अंदाज

Guhagar ST Bus Reservation Full: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी सज्ज होणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे गुहागर आगारातून २० दिवस आधीच तब्बल १७३ बसचे आरक्षण पूर्ण (Full) झाले आहे. गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, एकूण ४०० पेक्षा जास्त गाड्यांचे बुकिंग होईल, असा अंदाज आगाराच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची सेवा करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. वाडीवस्तीवर येणाऱ्या प्रवाशांची एसटी आरक्षणासाठी मोठी लगबग सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना वाहतूक नियंत्रक स्वप्नील शिंदे यांनी सांगितले की, १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीसाठी आगाराने विरार, बोरिवली, भांडुप, चिंचवड, विठ्ठलवाडी, कल्याण आणि स्वारगेट या प्रमुख मार्गांवर विशेष जादा बस सेवा पुरवली आहे.

सध्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ३५ गाड्यांचे आगाऊ वैयक्तिक आरक्षण झाले असून, १३३ गाड्यांचे ग्रुप बुकिंग (गट आरक्षण) पूर्ण झाले आहे. गुहागर आगारात सध्या एकूण ६१ गाड्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी १५ उत्तम गुणवत्तेच्या गाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आगाराला नव्याने मिळालेल्या १० नवीन गाड्यांमुळे यंदाच्या गणेशोत्सवात लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गतवर्षी गुहागर आगारातून ३७३ गाड्यांचे बुकिंग झाले होते, ज्यासाठी वरिष्ठ पातळीवरून ३५० जादा गाड्या पुरवण्यात आल्या होत्या. यंदा यापेक्षाही जास्त गाड्यांची गरज भासणार असून त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून गाड्यांची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांनी आणि चाकरमान्यांनी वेळेत एसटी महामंडळाच्या बसचे बुकिंग करून अधिकृत सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 04-09-2026