Lanja Police News: मानसिक संतुलन बिघडलेल्या बेवारस तरुणास लांजा पोलिसांनी दिले नातेवाइकांच्या ताब्यात

भिवंडी येथून आलेल्या कुटुंबीयांकडे सोपवले; लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व सहकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी

Lanja Police News: लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रूक येथे मानसिक संतुलन बिघडून बेवारसपणे फिरणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याला सुरक्षितपणे त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्याची कौतुकास्पद कामगिरी लांजा पोलिसांनी केली आहे.

मोहम्मद मुस्तकीम मासूम (वय २३, रा. भिवंडी शिवाजीनगर, जि. ठाणे) असे या मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाचे नाव असून तो रेल्वेने प्रवास करत लांजा परिसरात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामधील वेरवली बुद्रूक गावामध्ये मंगळवारी एक २३ वर्षीय तरुण मानसिक बिघडलेल्या अवस्थेत बेवारसपणे फिरताना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून स्वतःची वा नातेवाइकांबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी त्याला लांजा पोलीस ठाण्यात आणले.

त्या तरुणाच्या खिशात असलेल्या कागदावरून एक मोबाईल नंबर उपलब्ध झाला. पोलिसांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता त्याचे नातेवाईक भिवंडी शिवाजीनगर परिसरात राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांना तातडीने लांजा पोलीस ठाण्यात येण्याबाबत सूचना दिल्या.

नातेवाईक येईपर्यंत या तरुणाला सुरक्षिततेसाठी भाकर संस्थेत ठेवण्यात आले होते. बुधवारी मोहम्मद या तरुणाचे नातेवाईक भिवंडी येथून लांजा पोलीस ठाण्यात आले. आवश्यक ती चौकशी व कायदेशीर पूर्तता केल्यानंतर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि पोलीस अंमलदारांच्या उपस्थितीत या तरुणाला त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. लांजा पोलिसांच्या या संवेदनशील आणि तत्पर कामगिरीबद्दल सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 04-09-2026