सोन्याच्या दागिन्यांसह ७० हजारांची रोकड आणि ५४० अमेरिकन डॉलर लांबवले; रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
MIDC Mirjole Burglary Ratnagiri: रत्नागिरी तालुक्यातील एमआयडीसी मिरजोळे येथील बहार एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, ७० हजार रुपयांची रोकड तसेच अमेरिकन डॉलरचा समावेश आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शालिनी शंकर गंजे (वय ५०, गृहिणी) या बहार बंगला क्रमांक ५, एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनी, एमआयडीसी मिरजोळे येथे राहतात. त्या ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून वैयक्तिक कामासाठी जळगाव येथे गेल्या होत्या. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी त्या रत्नागिरीला परतण्यासाठी रेल्वे प्रवासात असताना दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वर्षा रवींद्र पाटील यांनी फोन करून त्यांच्या घराचे कुलूप तुटले असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिली.
शालिनी गंजे या सायंकाळी ६ वाजता घरी पोहोचल्या असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले आणि घरातील सामान विस्कटलेले आढळले. त्यांनी तात्काळ कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता चोरीचा प्रकार समोर आला.
चोरीस गेलेला मुद्देमाल: चोरट्याने घरातील कपाटातून सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, अंगठ्या, राणीहार, ब्रेसलेट, लक्ष्मीहार, कानातील डुल व टॉप्स, सोन्याचे व डायमंडचे मंगळसूत्र, ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि अमेरिकन चलनातील ५४० डॉलर असा एकूण ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या प्रकरणी शालिनी गंजे यांच्या तक्रारीवरून ३ सप्टेंबर रोजी पहाटे ५:१४ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंविच्या संबंधित कलमांनुसार घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 04-09-2026














