मुंबई-गोवा महामार्गावरील मोठ्या वळणावर ओव्हरटेक करताना भीषण अपघात; एसटी बसची समोरील काच व बंपरचे मोठे नुकसान
Bhoste Ghat Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या भोस्ते घाटातील मोठ्या वळणावर भरधाव कंटेनरने एसटी बसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. २ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात एसटी बसच्या समोरील काचेचे आणि पुढील उजव्या बाजूच्या बंपरचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बेपरवाईने वाहन चालवणाऱ्या कंटेनर चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या चिपळूण आगाराचे चालक फिर्यादी गोपाळ भिकसिंग राठोड (वय ४१, रा. चिपळूण) हे आपल्या ताब्यातील एसटी बस घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने जात होते. दुपारी १.५० वाजता बस भोस्ते घाटातील मोठ्या वळणावर आली असता, पाठीमागून आलेला भरधाव कंटेनर (क्रमांक MH 01 AG 5921) एसटी बसच्या जवळ आला.
कंटेनर चालकाने वळणावर अत्यंत निष्काळजीपणा दाखवत एसटी बसला उजव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पुढे जात असताना कंटेनरच्या पाठीमागील ट्रॉलीची डाव्या बाजूने एसटी बसला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेमुळे एसटी बसच्या समोरील उजव्या बाजूस अपघात होऊन बसची समोरील काच पूर्णपणे फुटली, तसेच पुढील उजव्या बाजूच्या बंपरचा पत्रा उखडून निघून बसचे प्रचंड नुकसान झाले.
याप्रकरणी एसटी चालक गोपाळ राठोड यांच्या तक्रारीवरून कंटेनर चालक अल्लारखा रा. हदीश अन्सारी (रा. पंचायत पूर्वीग्राम, पोस्ट चंदवारा, थाना चंदवारा, जि. कोडरमा, झारखंड) याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.५३ वाजता रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी, भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर होणाऱ्या ओव्हरटेकिंगमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 04-09-2026














