रांगोळ्यांमधून रेखाटलेल्या लोकशाही मूल्यांचे कौतुक; जमिनीवर बसून विद्यार्थिनींशी साधला आपुलकीचा संवाद
Divisional Commissioner Rubal Agarwal Visit Rajapur: राजापूर येथील नगर वाचनालयात ‘स्वीप’ (SVEEP) उपक्रमांतर्गत आयोजित मतदार जनजागृती प्रदर्शनाला कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी केवळ रांगोळी प्रदर्शनाची पाहणी केली नाही, तर शालेय विद्यार्थ्यांशी थेट, सहज आणि आपुलकीचा संवाद साधून त्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी जमिनीवर रांगोळीच्या विविध रंगांतून मतदानाचा हक्क, नागरिकांचे कर्तव्य आणि निवडणूक साक्षरतेचे प्रभावी पैलू अत्यंत नजाकतीने रेखाटले होते. विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी प्रत्येक कलाकृतीजवळ थांबून तिची आत्मीयतेने पाहणी केली. एका रांगोळीजवळ स्वतः जमिनीवर खाली बसून त्यांनी विद्यार्थिनींकडून ‘SIR’ (विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण) संकल्पना आणि ‘व्होटर हेल्पलाइन’च्या रेखाटनामागील नेमका उद्देश जाणून घेतला. शाळकरी मुलांनीही अत्यंत आत्मविश्वासाने लोकशाही मूल्यांची आणि निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांचा हा प्रगल्भ आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.
केवळ भाषणांमधून नव्हे, तर कलेच्या माध्यमातून लोकशाहीची मुळे नव्या पिढीच्या मनात खोलवर रुजवणारा हा उपक्रम प्रशासकीय कर्तव्य आणि संवेदनशीलतेचा एक उत्तम संगम ठरला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि या जनजागृती उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल कबनुरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांताधिकारी विश्वजित गाताडे आणि तहसीलदार विकास गंबरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 04-09-2026














