Poshan Aahar Food Quality Improvement: शालेय पोषण आहारातील अन्नधान्याचा दर्जात सकारात्मक बदल

अन्न व औषध प्रशासनाच्या कडक इशाऱ्याचा परिणाम; निकृष्ट दर्जाच्या धान्य पुरवठ्याला चाप, शिक्षक व पालकांमध्ये समाधान

रत्नागिरी :

Poshan Aahar Food Quality Improvement: महाराष्ट्र राज्यातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना पुरवठा करण्यात येत असलेल्या पोषण आहाराच्या अन्नधान्याच्या दर्जात लक्षणीय सुधारणा झाली असून दर्जा उंचावला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडक कारवाईनंतर आणि कडक धोरणांनंतर हे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जात कोणतीही हलगर्जी चालणार नाही, अशा सक्त सूचना अन्न व औषध प्रशासन खात्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्या होत्या. तसेच दोषी पुरवठादारांवर थेट कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर अन्नधान्याच्या दर्जात लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र आहे. या निर्णयामुळे शाळांमध्ये पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांसह शिक्षकवर्ग आणि पालकांकडून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

पूर्वी शाळांना पुरवठा केलेल्या अन्नधान्यात टोका, किडलेले धान्य, निकृष्ट डाळी, मुदत संपलेले खाद्यतेल आणि निकृष्ट तांदूळ आदींचे प्रमाण अधिक असायचे. पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना हे अन्नधान्य साफ करताना नाकी नऊ येत असत. मात्र, अलीकडे या धान्याचा दर्जा कमालीचा सुधारला आहे.

शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी आणि कुपोषण कमी व्हावे, यासाठी केंद्र शासनाने प्राथमिक शिक्षणासाठी ‘पोषण सहाय्य राष्ट्रीय कार्यक्रम’ जाहीर केला व शालेय पोषण आहार योजना सुरू केली. नोव्हेंबर २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत कोरडे अन्नधान्य विद्यार्थ्यांच्या घरी न देता प्रत्येक शाळेत गरम, ताजे अन्न शिजवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्रात २००२ पासून ही व्यवस्था सुरू झाली.

दिवसागणिक शाळांना पुरवठा केलेल्या अन्नधान्याचा दर्जा ढासळत चालला होता; मात्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर भूमिकेमुळे पोषण आहाराच्या दर्जात पुन्हा सुधारणा झाली आहे. सध्या शाळांना उत्तम प्रतीच्या डाळी, तांदूळ आणि मुदत न संपणारे खाद्यतेल मिळण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणीही पालकांकडून शासनाकडे केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 04-09-2026