एकाच कार्यक्रमासाठी दोन वेगवेगळी बिले काढल्याचा आरोप; राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांचे जिल्हा परिषद सीईओ वैदेही रानडे यांना निवेदन
राजापूर :
Rajapur ICDS Misappropriation Inquiry: राजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयामार्फत नव्याने नियुक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रशिक्षणासाठी मंजूर निधीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांनी केला आहे. एकाच कार्यक्रमासाठी दोन वेगवेगळी बिले काढल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वैदेही रानडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उपसभापती गुरव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, राजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती सेस अनुदानांतर्गत नव्याने नियुक्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक होते. या दोन्ही अनुदानांतून दोन वेगवेगळी प्रशिक्षणे घेऊन त्यासाठी मंजूर निधी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र, कार्यालयाकडून प्रत्यक्षात एकच कार्यक्रम घेऊन प्रशिक्षणाच्या नावाखाली दोन वेगवेगळी बिले काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
३१ मार्च रोजी प्रमाणक क्रमांक ५६ अन्वये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रशिक्षणासाठी ४२ हजार ६७० रुपये, तर प्रमाणक क्रमांक ५२ अन्वये पर्यवेक्षिका सत्कार खर्चासाठी १९ हजार ६०० रुपये, अशा दोन वेगवेगळ्या बिलांद्वारे निधी खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रकाराबाबत पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे.
मात्र, असे असतानाही १ सप्टेंबर रोजी पुन्हा नव्याने कार्यक्रम घेण्यात आला आहे. यामुळे आधीचा कार्यक्रम झाला असेल व त्याची बिले काढली असतील, तर पुन्हा कार्यक्रम घेण्यामागील नेमके धोरण काय, असा सवाल गुरव यांनी केला आहे. एक कार्यक्रम घेऊन ३१ मार्च रोजी दोन्ही बिलांची रक्कम खर्ची टाकून एकच प्रशिक्षण घेण्यामागचे कारण काय, हे एकूणच प्रकरण संशयास्पद असून यामध्ये अपहार झाल्याचे गुरव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तरी या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी उपसभापती अभिजित गुरव यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:35 04-09-2026














