पॅरिसमधील ‘इंटरनॅशनल स्पेस समिट’मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन; फ्रान्ससह जागतिक समुदायाला सहप्रवासी होण्याचे आवाहन
नवी दिल्ली:
Mission Space India: आंतरराष्ट्रीय कायद्यांवर आधारित सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत स्पेस डोमेनचे भारत पूर्णपणे समर्थन करतो. अंतराळातील शक्यता असीम असून आपली जबाबदारी ही सामूहिक आहे. भविष्याकडे पाहता २०३५ पर्यंत भारतीय स्पेस स्टेशनची (Bharatiya Antariksha Station) स्थापना करणे आणि २०४० पर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर पाठवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१० सप्टेंबर) केले. पॅरिसमध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल स्पेस समिट’ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना त्यांनी भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांचा आराखडा जगासमोर मांडला.
इस्रोची जागतिक प्रतिष्ठा आणि तांत्रिक प्रगती
संबोधनादरम्यान अंतराळ क्षेत्रातील भारताच्या अद्वितीय यशाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चंद्रयान-३ मोहिमेमुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा जगातील पहिला देश बनला आहे. याशिवाय आदित्य एल-१ मोहीम सूर्याची रहस्ये उलगडत आहे. ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ (इस्रो) चे तंत्रज्ञान आणि भागीदारी आज केवळ भारताच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या कामी येत आहे. या जागतिक विश्वासामागे भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या अनेक पिढ्यांचे समर्पण अन् कठोर परिश्रम आहेत, ज्यांनी रात्रंदिवस काम करून इस्रोची प्रतिष्ठा निर्माण केली आहे.
सुरक्षित व शाश्वत अंतराळ संशोधनावर भर
वैज्ञानिकांनी गोळा केलेला डेटा पारदर्शक व प्रामाणिकपणे सामायिक केला पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा संपूर्ण मानवजातीला होईल. भारताचा अंतराळ प्रवास याच ‘वसुधैव कुटुंबकम्’ विचारांचे दर्शन घडवतो. १९६० च्या दशकातील थुंबा येथील सुरुवातीच्या काळापासून फ्रान्स हा भारताचा विश्वासू भागीदार राहिला आहे. त्यामुळे फ्रान्स आणि इतर देशांनी भारताच्या पुढच्या पिढीच्या स्पेस रिसर्चमध्ये सहप्रवासी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सोबतच देशातील खाजगी अंतराळ क्षेत्रही वेगाने पुढे जात असून उद्योजकतेची ऊर्जा इस्रोच्या गुणवत्तेशी जोडली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 11-09-2026














