MPSC Exam Decision: मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत MPSC परीक्षार्थींच्या सर्व मागण्या मान्य; राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होणार

व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित; पुढील आठ दिवसांत कारवाईला सुरुवात करण्याचे आश्वासन

मुंबई :

MPSC Exam Decision: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, MPSC च्या संदर्भात घडलेल्या घटनांनंतर विद्यार्थ्यांचा संताप आणि उद्रेक पूर्णपणे योग्य असल्याचे विधान त्यांनी केले. या बैठकीनंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांची पुन्हा फेरतपासणी (Rechecking) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, तोपर्यंत नियोजित मुलाखती स्थगित ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

चौकशीसाठी SIT स्थापन आणि व्ही. राधा समितीची नियुक्ती

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय व परीक्षेच्या पातळीवर व्यापक सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एकूण सर्वंकष सुधारणा सुचवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यभरात फिरून विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी चर्चा करेल.

याशिवाय, औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणाचा सखोल तपास अंतिम टप्प्यापर्यंत नेला जाईल. तसेच लेंडवे, मराठे आणि नखाते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व परीक्षांची SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे. गट ‘ब’ आणि गट ‘क’ मुख्य व पूर्व परीक्षा २०२५ ची देखील चौकशी होईल. एमपीएससी अध्यक्ष अथवा सचिवांविरोधात पुरावा दिल्यास त्यांची स्वतंत्र चौकशी केली जाईल, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.

पारदर्शकतेसाठी माहिती अधिकार आणि तक्रार निवारण कक्ष

परीक्षेत १०० टक्के पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत (RTI) उत्तरपत्रिका मिळण्याची शिफारस आयोगाकडे केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समर्पित ‘तक्रार निवारण कक्ष’ उभारला जाईल.

पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी दोन्ही पायांना चिप लावणे अथवा समान गुण पॅटर्न लागू करणे यावर काम केले जाईल. सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थांचे प्रश्नही मार्गी लावले जातील. पुढील सर्व परीक्षा पूर्णपणे फुलप्रूफ व पारदर्शक पद्धतीने घेण्यासाठीच काही काळ लांबणीवर टाकल्याचे स्पष्ट करत, या सर्व निर्णयांवर येत्या ८ दिवसांत कालबद्ध कारवाई सुरू केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 11-09-2026