तात्पुरत्या प्रवासी शेडचे लोकार्पण; २४ तास पाणीपुरवठा आणि महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल उभारण्याचे निर्देश
रत्नागिरी:
Mandangad Bus Stand: मंडणगड तालुक्यातील नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या सोयीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी नवीन बसस्थानक इमारत उभारण्यात येत असून, त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नव्या इमारतीचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या प्रवासी शेडचे उद्घाटन गुरुवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे तालुक्यातील नागरिकांची प्रदीर्घ काळाची वाहतुकीची गैरसोय कायमस्वरूपी दूर होईल, असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक सोयीसुविधा अन् चार्जिंग स्टेशन
भूमिपूजनानंतर आयोजित समारंभात बोलताना कदम म्हणाले की, समस्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाय शोधण्यावर आपला भर असतो. जुनी इमारत पाडून उभारण्यात येणाऱ्या या नव्या अत्याधुनिक इमारतीमुळे स्वच्छतागृहांचा प्रश्न मिटेल आणि परिसराचे सुशोभीकरण होईल. केवळ इमारत न उभारता जुन्या बसेस बदलून आगाराच्या मागणीनुसार नव्या बसेस दिल्या जातील, तसेच भविष्यातील इलेक्ट्रिक बसेससाठी तातडीने चार्जिंग स्टेशनची जागा निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
महिला बचत गटांसाठी मॉल आणि पाणी योजनेला गती
स्थानिक महिला बचत गटांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी बसस्थानक परिसरात स्वतंत्र मॉल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच, मंडणगड नगरपंचायतीच्या पाणी योजनेचा निधी मंजूर झाला असून, सर्व तांत्रिक अडचणी दूर करून शहरातील प्रत्येक घरात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी काम जलदगतीने सुरू केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, तहसीलदार अक्षय ढाकणे आणि आगारप्रमुख मदनीपाशा जुनेदी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 11-09-2026














