BJP Konkan Meeting: आगामी निवडणुकांसाठी भाजपची कोकणात मोर्चेबांधणी! सावंतवाडी, रत्नागिरीत जिल्हा कार्यकारिणी बैठका संपन्न

गावागावांत देशभक्त कार्यकर्त्यांची फळी उभारावी; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

सावंतवाडी/रत्नागिरी:

BJP Konkan Meeting: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कोकण विभागात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची, तर रत्नागिरीमध्ये दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याने तन, मन आणि धनाने झोकून देऊन गावागावांत देशभक्त कार्यकर्त्यांची फळी उभारावी आणि बूथ पातळीवर पक्ष संघटना अभेद्य करावी, असे स्पष्ट आवाहन चव्हाण यांनी केले.

जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश

बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले जनकल्याणाचे प्रकल्प आणि लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी थेट आणि सातत्यपूर्ण संवाद ठेवावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच या बैठकीत एस.आय.आर., सेवा संकल्प अभियान आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग यांसारख्या वैचारिक व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

रत्नागिरी व कणकवली येथील ‘भाजप भवन’ची पाहणी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार असून अनेक नगरपरिषदांमध्ये पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक सक्रिय आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींच्या विकासकामांना मजबूत संघटनात्मक संपर्काची जोड देऊन कोकणातील जनाधार विस्तारण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. दौऱ्यादरम्यान प्रदेशाध्यक्षांनी कणकवली व रत्नागिरी येथे उभारल्या जाणाऱ्या ‘भाजप भवन’ जिल्हा कार्यालयांच्या बांधकामाची पाहणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संकल्पनेतून साकारणारी ही कार्यालये राष्ट्रसेवेची कार्यशाळा, जनआकांक्षांचे व्यासपीठ आणि कार्यकर्त्यांचे ऊर्जाकेंद्र बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 11-09-202