Rohit Pawar on Devendra Fadnavis: MPSC पेपरफुटीप्रकरणी केवळ SIT नेमणे म्हणजे वेळ मारून नेण्याचा प्रकार; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

एमपीएससी अध्यक्षांच्या निलंबनासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करा किंवा राजीनामा मागा; राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आक्रमक

मुंबई :

Rohit Pawar on Devendra Fadnavis: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सर्व मागण्या मान्य केल्या असल्या, तरी विरोधकांनी यावर तीव्र निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर टीका करत MPSC पेपरफुटी प्रकरणात केवळ SIT (विशेष तपास पथक) स्थापन करणे म्हणजे निव्वळ वेळ मारून नेण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

‘SIT स्थापन झाली, पण पुढे काय झाले?’ – रोहित पवार

रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, राज्यात यापूर्वी खारघर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, डॉ. संपदा मुंडे प्रकरण, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणासह अनेक घटनांमध्ये SIT स्थापन करण्यात आली. मात्र, या SIT तपासाचे पुढे काय झाले आणि काय निष्कर्ष निघाले, याचा कोणालाच ताळमेळ नाही. त्यामुळे केवळ चौकशीची आश्वासने देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही.

आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाईची मागणी

विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असल्यास, राज्य सरकारने तातडीने राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींकडे MPSC अध्यक्षांवर कारवाई करण्याची शिफारस करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. राष्ट्रपतींकडून प्रक्रिया सुरू झाल्यास कारवाई पूर्ण होईपर्यंत राज्यपाल अध्यक्षांना निलंबित करू शकतात. जर ही कायदेशीर प्रक्रिया कठीण वाटत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राला (MPSC अध्यक्ष) राजीनामा देण्याचा सल्ला द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

शासनाकडून सर्वंकष सुधारणा अन् व्ही. राधा समितीचे आश्वासन

दुसरीकडे, औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास अंतिम टप्प्यापर्यंत नेला जाईल आणि परीक्षा प्रणाली सुधारण्यात सरकारला स्वारस्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. MPSC मध्ये सर्वंकष सुधारणा सुचवण्यासाठी श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती गठित करण्यात आली असून, ही समिती राज्यभरात जाऊन विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी थेट चर्चा करून अहवाल सादर करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 11-09-2026