‘लंडनमध्ये डिझाइन आणि महाराष्ट्रात उत्पादन करा’; संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
लंडन:
Eknath Shinde In London: महाराष्ट्रात पर्यावरणाचे भान ठेवूनच नवा विकास घडवला जात असून ब्रिटनने आपले ‘ग्रीन कॅपिटल’ आणि प्रगत तंत्रज्ञान घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या वतीने लंडन येथील संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित ‘महाराष्ट्र-भारत-यूके डायलॉग’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. सार्वजनिक सेवेतील योगदान आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेल्या धोरणात्मक नेतृत्वाची दखल घेत या परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अत्यंत मानाच्या ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.
‘लंडनमध्ये डिझाइन करा, महाराष्ट्रात उत्पादन करा’
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करत एकनाथ शिंदे यांनी भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापाराला नवी दिशा मिळाली असल्याचे स्पष्ट करत त्यांनी, “लंडनमध्ये डिझाइन करा आणि महाराष्ट्रात उत्पादन करा” अशी नवी औद्योगिक भागीदारी उभारण्याचे आवाहन ब्रिटिश उद्योगविश्वाला केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी एक टीम म्हणून काम करत असून, परकीय थेट गुंतवणूक (FDI) वाढवणे हेच राज्याचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. बॅरोनीस गीता नारगुंड, लॉर्ड रेमिरेंजर आणि लॉर्ड रवेल यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाचा समतोल
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या क्रांतीचा उल्लेख करताना त्यांनी समृद्धी महामार्ग, वाढवण बंदर, अटल सेतू, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. यासोबतच, मुंबईने दक्षिण आशियातील पहिला ‘नेट-झिरो क्लायमेट ॲक्शन प्लॅन’ सुरू केला असून २०३० पर्यंत राज्याची ५० टक्के विजेची गरज स्वच्छ ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दावोस येथे झालेल्या करारांपैकी ७५ टक्के करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगत महाराष्ट्रात निर्णयप्रक्रियेला मोठा वेग दिल्याचा विश्वास त्यांनी गुंतवणूकदारांना दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 11-09-2026














