BRICS Summit: बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान ब्रिक्स परिषदेला अनुपस्थित राहणार; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

शेख हसीना यांच्या वक्तव्यानंतर तणाव वाढल्याची पार्श्वभूमी; भारत दौऱ्यासाठी स्वतंत्र द्विपक्षीय आयोजनाची तयारी

नवी दिल्ली:

BRICS Summit: नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आयोजित १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला (BRICS Summit) बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान उपस्थित राहणार नाहीत. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायून कबीर यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. बांगलादेश ब्रिक्सचा सदस्य देश नसला, तरी बिमस्टेकचे (BIMSTEC) अध्यक्ष या नात्याने भारताने त्यांना ब्रिक्स आउटरीच सत्रासाठी विशेष निमंत्रण दिले होते. मात्र, ढाकाकडून त्यांच्या अनुपस्थितीची पुष्टी करण्यात आली आहे.

भारत आणि बांगलादेशमधील तणाव अन् दौरा लांबणीवर

तारिक रहमान यांचा भारत दौरा पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी होणारा त्यांचा भारत दौरा रद्द करण्यात आला होता. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच राजनैतिक तणाव सुरू आहे. ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी दिल्लीतून घेतलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेवर बांगलादेश सरकारने तीव्र आक्षेप नोंदवला होता. भारताने ही पत्रकार परिषद रोखली नाही, ज्यामुळे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना बाधा पोहोचल्याचे ढाकाचे म्हणणे आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कबीर यांच्या मते, सध्या सरकार तारिक रहमान यांच्या भारतासोबतच्या स्वतंत्र द्विपक्षीय दौऱ्याची तयारी करत आहे.

ब्रिक्स आउटरीच सत्र आणि बिमस्टेक संदर्भ

ब्रिक्स आउटरीच बैठकीत आयोजक देश इतर बिगर-सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना आणि प्रादेशिक संघटनांच्या अध्यक्षांना जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, ऊर्जा आणि सुरक्षा या मुद्द्यांवर चर्चेसाठी आमंत्रित करतो. भारताने २०१६ च्या गोवा ब्रिक्स परिषदेतही सर्व बिमस्टेक देशांच्या नेत्यांना निमंत्रित केले होते. दक्षिण व आग्नेय आशियातील व्यापार, प्रादेशिक संपर्क व आर्थिक सहकार्यासाठी बिमस्टेक संघटना महत्त्वपूर्ण मानली जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 11-09-2026