Finolex Anganwadi Renovation: रत्नागिरीत मुकुल माधव फाऊंडेशनकडून चार अत्याधुनिक अंगणवाड्यांचे लोकार्पण

गोळप आणि कोळंबे परिसरात बालशिक्षणाला नवी दिशा; सीएसआर उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यातील कामेही प्रगतीपथावर

फिनोलेक्स अंगणवाडी नूतनीकरण उपक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील गोळप आणि कोळंबे परिसरातील चार अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अंगणवाड्यांचे लोकार्पण नुकतेच पार पडले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून, कंपनीच्या सीएसआर निधीतून आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या सहकार्याने हा सामाजिक प्रकल्प राबवला जात आहे. ग्रामीण भागातील चिमुरड्यांना दर्जात्मक पूर्वप्राथमिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून ही संकल्पना प्रत्यक्ष रूपात साकारण्यात आली आहे.

या नुकत्याच संपन्न झालेल्या टप्प्यामध्ये गोळप मोहल्ला येथील उर्दू माध्यमाची अंगणवाडी, तसेच कोळंबे गावातील वाकीवाडी, मांडवकरवाडी आणि गोरीवलेवाडी या चार अंगणवाड्यांच्या इमारतींचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले आहे. या सर्व इमारतींवर मनमोहक रंगकाम करण्यात आले असून, बालकांच्या आकलनाला गती देणाऱ्या ज्ञानवर्धक ‘बोलक्या भिंती’ तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय, दर्जेदार शैक्षणिक साहित्य आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने, आता ग्रामीण भागातील लहान मुलांना स्वच्छ, हवेशीर आणि डिजिटल युगाला साजेशा आनंददायी वातावरणात शिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत.

स्थानिक पातळीवर शैक्षणिक पाया मजबूत करणाऱ्या या प्रकल्पाची व्याप्ती वाढवली जात असून, गोळप-दाभिळवाडी आणि कोळंबे-बागवाडी येथील आणखी दोन इमारतींच्या नूतनीकरणाचे काम सध्या तिसऱ्या टप्प्यात वेगाने सुरू आहे.

फिनोलेक्स अंगणवाडी नूतनीकरण प्रकल्पाच्या तिन्ही टप्प्यांचा विचार करता, रत्नागिरी परिसरात आतापर्यंत एकूण १७ अंगणवाड्यांचा कायापालट करण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात फणसोप, रनपार, गोळप, पावस आणि कोळंबे परिसरातील १३ अंगणवाड्यांचे नूतनीकरण करून त्या बालकांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या होत्या. लहान मुलांच्या पायाभूत बौद्धिक, शारीरिक व भावनिक विकासाचे केंद्र असलेल्या या अंगणवाड्यांना या उपक्रमामुळे एक नवे वैभव प्राप्त झाले आहे.

या विशेष लोकार्पण सोहळ्याला आकाशवाणी रत्नागिरी–सिंधुदुर्गचे स्टेशन डायरेक्टर डॉ. सुनील गायकवाड, कार्यक्रम अधिकारी विवेक वानखेडे, सुहास नंदुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी केदार चव्हाण व संदीप पाटील, ॲड. गौरव महाजनी तसेच ॲड. रुची महाजनी उपस्थित होते. याशिवाय फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे रामबाबू संका, सागर चिवटे, नंदकुमार शिंपी, अमित घोरपडे, आशिष आठवले आणि मुकुल माधव फाऊंडेशनचे शुभम भेगडे, शामराव निंबाळकर व वरद गोरे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या बालविकास उपक्रमामुळे ग्रामीण भागात समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 11-09-2026