Traffic Police Action Ratnagiri: वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; रत्नागिरी जिल्ह्यात चौघांवर गुन्हे दाखल

जयगड, शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई

रत्नागिरी:

रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. याप्रकरणी जयगड, रत्नागिरी शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात एकूण चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जयगड पोलिसांनी वरवडे फाटा येथे अडथळा ठरणारी रिक्षा उभी केल्याप्रकरणी अब्दुलरहमान दिलावर मुजावर (वय ४०, रा. शिवखोल, रत्नागिरी) याच्यावर कारवाई केली. त्याने जयगड-रत्नागिरी मार्गावरील वरवडे फाटा येथे आपली रिक्षा (एमएच-०८-बीसी-५२६५) उभी केली होती. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांकडून दोन टेम्पो चालकांवर गुन्हा

रत्नागिरी शहर पोलिसांनी मारुती मंदिर सर्कल, साळवी स्टॉप तसेच जे. के. फाइल्स-शिवाजीनगर मार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणार्या दोन टेम्पो चालकांवर वाहने उभी केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. शहर पोलिसांनी सलमान सय्यदुद्दीन शेख (३६, रा. एमआयडीसी, मिरजोळे) आणि मंगेश दत्ताराम करंजवकर (५६, रा. कासारवेली) यांच्यावर गुन्हे दाखल केले. शेख याचा टेम्पो (एमएच-०८-एपी-२६६५) आणि करंजवकर यांचा टेम्पो (एमएच-०८-एपी-३८६१) रस्त्यावर उभा असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.

पाली एसटी स्टँडजवळ ग्रामीण पोलिसांची कारवाई

पाली एसटी स्टँडसमोर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी भिमाशंकर तुळजाराम गोंधळी (४३, रा. पाली बाजारपेठ) याच्यावर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

रस्त्यावर निष्काळजीपणे वाहने उभी करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात जिल्हाभरात सध्या व्यापक प्रमाणात कारवाई मोहीम राबवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 11-09-2026