पालकमंत्र्यांच्या हस्ते खेडमध्ये निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन; निसर्ग संवर्धन व जैवविविधतेच्या प्रसारासाठी नवीन उपक्रम

जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत सात्विणगाव येथे उभारले अत्याधुनिक केंद्र; १२ सप्टेंबर रोजी पार पडणार सोहळा

खेड:

महाराष्ट्र शासन वन विभाग आणि वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील सात्विणगाव येथे उभारण्यात आलेल्या ‘निसर्ग माहिती केंद्रा’चे १२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन होणार आहे. जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, यामुळे परिसरातील निसर्ग संवर्धन आणि जैवविविधतेच्या माहितीला नवी दिशा मिळणार आहे.

या सोहळ्याला राज्यमंत्री (गृह-शहर, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन) योगेश कदम तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत तसेच मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर श्री लक्ष्मी (भा.व.से.) उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय सन्माननीय अतिथी म्हणून जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचीदेखील विशेष उपस्थिती असणार आहे.

निसर्ग संवर्धन आणि पर्यटन विकासाला चालना

निसर्ग संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि स्थानिक जैवविविधतेची माहिती नागरिक तसेच पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, या मुख्य उद्देशाने हे केंद्र सात्विणगाव येथे विकसित करण्यात आले आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड व परिक्षेत्र वनअधिकारी (दापोली) राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 11-09-2026