महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतील प्रारूप मतदार यादी जाहीर; चुकीची माहिती दिल्यास शिक्षेची तरतूद
रत्नागिरी:
विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर)-२०२६ अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांबाबत नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपल्या नावाबाबत आवश्यक दुरुस्ती किंवा हरकत असल्यास विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नवीन मतदारांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ आणि त्यासोबत आवश्यक घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. याशिवाय, मतदार यादीतील पूर्वीच्या पत्त्यावर सध्या वास्तव्य नसलेल्या किंवा अन्यत्र स्थलांतरित झाल्यामुळे नाव समाविष्ट होऊ न शकलेल्या नागरिकांनाही त्यांच्या सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणावरून नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विविध अर्जांचे नमुने आणि प्रक्रिया
मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना ७ भरावा लागेल, तर नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना ८ भरणे आवश्यक आहे. याशिवाय, मतदार ओळखपत्रातील बदल, दिव्यांग चिन्हांकन तसेच पत्त्यातील बदलासाठीही नमुना ८ अंतर्गत अर्ज करता येणार आहे.
नागरिकांकडून दावे व हरकती प्राप्त झाल्यानंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून त्यासंबंधीच्या याद्या सूचना फलकावर प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर सात दिवसांची मुदत देऊन नियमानुसार त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एसआयआर-२०२६ अंतर्गत प्राप्त झालेले दावे व हरकतींची सर्व माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘Claims and Objections during SIR-2026’ या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार मतदार यादीच्या पुनरीक्षणासंदर्भात चुकीचे विधान अथवा खोटी घोषणा करणाऱ्या व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करताना पूर्णपणे अचूक आणि खरी माहिती सादर करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 11-09-2026














