Illegal Cattle Transport: पाचल परिसरात वैभववाडी पोलिसांची धडक कारवाई; भुईबावडा घाटातून होणारी जनावरांची अवैध वाहतूक उधळली

१० जनावरांची सुटका; दोन टेम्पोसह सात जणांवर गुन्हे दाखल; गोरक्षकाच्या माहितीवरून पोलिसांची नाकेबंदी

पाचल:

राजापूरहून भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूर आणि निपाणीच्या दिशेने कत्तलीसाठी होणारी जनावरांची अवैध वाहतूक वैभववाडी पोलिसांनी धाडसी कारवाई करत उधळून लावली आहे. या धडक कारवाईत दाटीवाटीने कोंबलेल्या १० जनावरांची यशस्वी सुटका करण्यात आली असून, दोन टेम्पो जप्त करत एकूण सात जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) सकाळी साडेआठच्या सुमारास भुईबावडा घाटात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापूरहून भुईबावडा घाटातून अवैध मार्गाने गुरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची गुप्त माहिती गोरक्षक मंगेश पडवळ यांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने भुईबावडा घाटात तातडीने नाकेबंदी केली. नाकेबंदीदरम्यान संशयितरीत्या येणारे दोन टेम्पो पोलिसांनी अडवले.

परवान्याशिवाय आणि कत्तलीसाठी वाहतूक

पोलिसांनी दोन्ही वाहनांची सखोल तपासणी केली असता, त्यात अत्यंत अमानुषपणे प्रत्येकी ५ अशी एकूण १० जनावरे दाटीवाटीने बांधून कत्तलीसाठी आणि कोणत्याही वैध परवान्याशिवाय नेली जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तत्काळ सर्व जनावरांची सुटका करत वाहने ताब्यात घेतली.

सात जणांवर गुन्हे दाखल

या बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी मंदार संजय पाटणकर, महंमदअली दाऊद काझी, विनायक मोहन भोईटे, वासिम सोलापुरे, शब्बीर भैरी, नवाझ आणि सर्जेराव सदाशिव सावंत या सात जणांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:38 11-09-2026