Dapoli Power Cut: दापोलीत महावितरणचा भोंगळ कारभार; तासन् तास वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त

दर सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली दिवसभर वीज बंद; शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि व्यवसाय विस्कळीत

दापोली:

दापोली शहरालगतच्या आणि ग्रामीण भागात महावितरणच्या वीजपुरवठ्याचा पुरता खेळखंडोबा सुरू आहे. वारंवार ५-५ तास वीज गायब होत असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. दर सोमवारी नियमित दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणकडून दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवला जातो. मात्र, ही दुरुस्ती केल्यानंतरही आठवडाभर वीज खंडित होण्याचे सत्र सातत्याने सुरूच राहत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनियमित वीजपुरवठ्यामुळे घरगुती कामांसह स्थानिक दुकाने, लघुउद्योग आणि दैनंदिन व्यवसायांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होत आहे. वीज नसल्यामुळे पाणीपुरवठ्याचे पंप बंद राहतात, ज्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विद्युत उपकरणांचे नुकसान आणि वाढता असंतोष

दिवसातून वारंवार वीज ये-जा करत असल्याने घरातील व दुकानांतील महागड्या विद्युत उपकरणांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दर सोमवारी पूर्ण दिवस दुरुस्तीचे काम करूनही वीजपुरवठा सुरळीत का होत नाही, असा सवाल उपस्थित करत महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महावितरणने वीजपुरवठ्याचा हा खेळखंडोबा त्वरित थांबवून यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी, अशी आक्रमक मागणी दापोलीतील नागरिकांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:38 11-09-2026