रत्नागिरी जिल्ह्यातील ७ फळरोपवाटिकांची उत्कृष्ट कामगिरी; आंबा, काजू आणि मसाल्यांच्या रोपांची मोठी विक्री
राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या फळरोपवाटिकांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील फळरोपवाटिकांनी राज्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, दालचिनी, काळीमिरी यांसारख्या विविध रोपांच्या विक्रीतून मागील पाच महिन्यांत मोठे उत्पन्न मिळवत राज्यातील १४५ फळरोपवाटिकांमधून रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी-भाट्ये आणि हातखंबा-झारेवाडी या फळरोपवाटिकांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक पटकावून शासकीय दरबारात मोठी झेप घेतली आहे.
जिल्ह्यातील सात फळरोपवाटिकांचे नेटवर्क
रत्नागिरी जिल्ह्यात कृषी विभागाच्या एकूण सात फळरोपवाटिका कार्यरत आहेत.
- रत्नागिरी तालुका: पोमेंडी-भाट्ये आणि हातखंबा-झारेवाडी
- गुहागर तालुका: पालशेत (प्रादेशिक फळबाग केंद्र)
- चिपळूण तालुका: मुढे (प्रादेशिक फळबाग केंद्र)
- खेड तालुका: भरणे नाका आणि तिसंगी
- संगमेश्वर तालुका: निवे
- राजापूर तालुका: जुवाटी
या सर्व फळरोपवाटिकांमध्ये स्थानिक फळांची कलमे व रोपे तयार करून जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना प्राधान्याने वितरित केली जातात.
विक्रमी विक्री आणि उत्पन्न
मागील पाच महिन्यांत पोमेंडी-भाट्ये येथील तालुका फळरोपवाटिकेतून तब्बल ३१ लाख ८० हजार ३९५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर हातखंबा-झारेवाडी येथील फळरोपवाटिकेतून २७ लाख ५३ हजार २० रुपयांची रोपे आणि गांडूळ खतांची विक्री झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या हातखंबा-झारेवाडी फळरोपवाटिकेत यावर्षी काजूच्या ‘वेंगुर्ला’ जातीची सुमारे दीड लाख कलमे तयार करण्यात आली होती. त्यापैकी १ लाखांहून अधिक कलमांची विक्री झाली असून ४५ हजार कलमे अद्याप शिल्लक आहेत. तसेच आंब्याची जवळपास १२ हजार रोपे विक्रीसाठी तयार ठेवण्यात आली असून काळीमिरी व दालचिनीच्या रोपांचीही मोठी विक्री झाली आहे.
“हातखंबा-झारेवाडी फळरोपवाटिकेत ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर असून, सध्या दोन व्यक्तींच्या सोबतीने उर्वरित सात जणांचे काम केले जात आहे. फळरोपवाटिकेत लागणारे मजूरही कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्यात आले आहेत. झारेवाडी येथील रोपवाटिकेला शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.”
– सुमित शेडगे, जिल्हा उपकृषी अधिकारी, हातखंबा-झारेवाडी तालुका फळरोपवाटिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 12-09-2026














