गोवा बनावटीच्या दारू विक्रेत्यांवर कडक कारवाईसाठी पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथे सुरू असलेल्या कथित अवैध गोवा बनावटीच्या दारू विक्रीला आळा घालून विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप दत्ताराम गोठणकर यांनी राजापूर पोलीस निरीक्षक, स्थानिक सरपंच, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत दारू विक्रीचा आरोप
गोठणे-दोनिवडे हे सुमारे ३०० लोकवस्तीचे छोटे गाव आहे. या गावातील काही ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या अवैध धंद्यांमुळे गावातील नागरिक, महिला तसेच शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना दारूविक्रीच्या ठिकाणांमुळे नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रदीप गोठणकर यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामसभेत अवैध दारूविक्रीविरोधात एकमुखाने ठराव
दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या गावाच्या ग्रामसभेतही या अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली होती. ग्रामसभेत अवैध दारूविक्रीवर सामूहिकरीत्या बंदी घालण्याचा तसेच असे अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे नष्ट करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
आता या प्रकरणी पोलीस व तालुका प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 12-09-2026














