इंडो-अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स सोहळ्यात गडकरींकडून ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा पुनरुच्चार
अथांग लोकसंख्येमुळे बेरोजगारी आणि गरिबी ही अजूनही देशासमोरील मोठी आव्हाने असल्याचे मोठे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. एकीकडे केंद्र सरकार देशात रोजगार निर्मिती आणि विकासाचा दावा करत असताना, गडकरी यांच्या या विधानाची राजकीय व आर्थिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य
मुंबईत आयोजित २२ व्या ‘इंडो-अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात बोलताना नितीन गडकरी यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. आपले केंद्र सरकार पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण यांसारख्या पायाभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, पूल आणि विविध प्रकल्पांमुळे तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असला, तरी देशातील विकासकामे वेगाने सुरूच राहतील, असे ते म्हणाले. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारत-अमेरिका सहकार्य ठरेल ‘विन-विन’
अमेरिका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर असून, सध्या भारत-अमेरिका धोरणात्मक सहकार्याची ही अत्यंत योग्य वेळ आहे. या सहकार्यामुळे दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ (परस्पर फायदेशीर) परिस्थिती निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान व त्यांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
उद्योजकतेतूनच बेरोजगारी व गरिबी दूर होईल
भविष्यातील विकासासाठी ज्ञान हे सर्वात महत्त्वाचे साधन असून, या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे गरजेचे आहे. भारतातील तरुण आणि प्रतिभावान इंजिनिअर्स, विशेषतः सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, ही देशाची मोठी ताकद आहे. उद्योजक हे केवळ संपत्ती निर्माण करणारे नसून रोजगाराचे निर्मातेही आहेत. उद्योजकतेला चालना मिळाल्याशिवाय भांडवली गुंतवणूक आणि उद्योगांचा विस्तार शक्य नाही. उद्योग वाढल्यास रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि यातूनच बेरोजगारी व गरिबी कमी करण्यास मोठी मदत होईल, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 12-09-2026














