School Leaving Certificate Correction: शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त करता येणार; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

School Leaving Certificate Correction: शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त करता येणार; मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नियमानुसार दुरुस्तीचा मार्ग मोकळा

शाळा सोडल्याचा दाखला दुरुस्ती प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने (Full Bench) एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली कोणतीही चूक विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही नियमानुसार दुरुस्त करता येऊ शकते, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे शाळा सोडल्यानंतर दाखल्यावर नाव, जन्मतारीख किंवा इतर नोंदी चुकीच्या असल्याचे लक्षात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे, केवळ या तांत्रिक कारणावरून त्याच्या रेकॉर्डमधील किंवा दाखल्यातील दुरुस्ती नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. शालेय दाखल्यावरील चुकीच्या नोंदींमुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर प्रशासकीय व शासकीय प्रक्रियेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर दुरुस्तीचा मार्ग सुकर आणि खुला झाला आहे.