अमित शाह यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांची थोबाडं काळी झाली असती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमित शाह यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांची थोबाडं काळी झाली असती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईतील राजभाषा संमेलनातील वक्तव्यावरून वाद; विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रत्युत्तर

अमित शाह यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी भाषेबाबत केलेले भाषण विरोधकांनी पूर्ण ऐकले असते, तर त्यांची थोबाडं काळी झाली असती, असा खरमरीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. नवी मुंबईत आयोजित राजभाषा संमेलनात अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आणि मनसेने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

नवी मुंबईतील संमेलनात अमित शाह यांनी महाराष्ट्र ही सगळ्यात मोठी बहुभाषी भूमी असल्याचे नमूद केले होते. तसेच, मातृभाषेसोबत दुसरी राष्ट्रीय भाषा शिकण्यास विरोध करणारे पाप करत आहेत, असे विधान त्यांनी केले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, तूर्तास एवढेच…" अशी सोशल मीडियावर पोस्ट करत अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.

मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

विरोधकांच्या या भूमिकेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "अमित शाह काय बोलले ते सिलेक्टिव्ह ऐकून त्यावर टीका करणे योग्य नाही. त्यांनी महाराष्ट्रात मराठीचे स्थान कसे अव्वल आहे आणि मातृभाषेचे महत्त्व काय आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. महाराष्ट्रातील लोक बहुभाषिक असले तरी आपली मातृभाषा बदलत नाही. अमित शाह यांचे पूर्ण भाषण ऐकले असते तर विरोधकांवर ही वेळ आली नसती."

मनोज जरांगे आंदोलन आणि दिशा सालियन प्रकरणावर भाष्य

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी नाकारलेल्या परवानगीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे सांगितले. "मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सव हा खूप मोठा सण असतो. या काळात कायदा-सुव्यवस्था राखणे अत्यंत गरजेचे आहे. जरांगे यांच्या अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या असून काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत. त्यांच्या नव्या अर्जावर गुणवत्तेच्या आधारावर (Merit) निर्णय घेतला जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या नव्या एफआयआरवर प्रतिक्रिया देताना, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय तपास करत असून आपण एफआयआर पाहिलेला नाही, त्यामुळे यावर तर्कवितर्क करणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.