भातासह इतर पिकांना पावसाची नितांत गरज; हवामान बदलामुळे खोकला, ताप आणि सर्दीच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तीव्र उकाडा वाढला आहे. जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असला तरी रविवारी काही भागांत पडलेल्या हलक्या सरींनंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. पावसाळ्यातच ऐन ‘ऑक्टोबर हिट’सारखे कडक ऊन पडत असल्याने नागरिक उकाड्याने प्रचंड त्रस्त झाले असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आता जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. केवळ जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे भात व नाचणीची लावणी आणि पेरणीची कामे वेळेत पूर्ण झाली होती आणि पिकेही बहरली होती. परंतु, आता पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे घराबाहेर पडताना नागरिकांना छत्र्या, रुमाल आणि गॉगलचा आधार घ्यावा लागत आहे.
हवामान बदलामुळे साथरोग वाढले; ओपीडी हाऊसफुल्ल
जिल्ह्यात कधी पाऊस, कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरण अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे साथीचे आजार वेगाने पसरत आहेत.
रुग्णालयांमध्ये गर्दी: जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग (OPD) हाऊसफुल्ल झाले आहेत.
आजारांचे प्रमाण वाढले: हवामानातील बदलांमुळे खोकला, ताप, सर्दी, अंगदुखी आणि डोकेदुखीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. रुग्णालयांबाहेर तपासणीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.













