Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना नवीन मानहानीची नोटीस; सतीश सालियन बजावणार नोटीस

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना नवीन मानहानीची नोटीस; सतीश सालियन बजावणार नोटीस

१९ सप्टेंबरला ‘मातोश्री’वर जाऊन नोटीस बजावण्याची तयारी; सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी

Disha Salian Case च्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल केल्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर ते माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा मानहानीची नोटीस बजावणार आहेत. सतीश सालियन आपल्या कायदेशीर टीमसह १९ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता आदित्य ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन ही नोटीस देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

१६ सप्टेंबरच्या सोशल मीडिया पोस्टवरून नोटीस

आदित्य ठाकरे यांनी १६ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरून ही नवीन मानहानीची नोटीस दिली जाणार आहे. आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांचा रोख थेट आपल्याकडेच असल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला आहे. कायदेशीर मार्गाने न्यायाची मागणी करत असताना आपल्यावर राजकीय हेतू आणि वैयक्तिक वैमनस्यातून आरोप केले जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. नोटीस बजावताना संभाव्य अडथळा किंवा सुरक्षेचा धोका लक्षात घेता सतीश सालियन यांनी आपल्या कायदेशीर टीमसाठी मुंबई पोलिसांकडे विशेष पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. निष्पक्ष आणि कायदेशीर चौकशीसाठी आपला लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

infigo

आदित्य ठाकरेंचे सोशल मीडियावरून स्पष्टीकरण

दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापोटी आणि चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने गेल्या ६ वर्षांपासून या घटनेशी माझं नाव जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच, अधिकृत यंत्रणांना कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निस्पृहपणे या प्रकरणाची चौकशी करू द्यावी, असे सांगत अशा खोट्या प्रचाराने आपल्याला शांत बसवता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.