बाजारातून चालताना पाठीमागून दिली जोरदार धडक; महिला हवेत उडून जमिनीवर कोसळली; पालिकेविरुद्ध संताप
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात मोकाट आणि उनाड जनावरांचा वाढता वावर निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठ परिसरातील मारुती आळी येथे भरदिवसा रस्त्यावरून धावत सुटलेल्या उनाड गुरांनी एका पादचारी महिलेला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ती महिला थेट हवेत फेकली जाऊन जमिनीवर आदळली. या दुर्दैवी दुर्घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली आहे.
धावणाऱ्या गुरांच्या टोळक्याने महिलेला उडवले
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास एक महिला मारुती आळीतून पायी जात होती. त्याचवेळी ५ ते ६ उनाड गुरांचे टोळके अचानक रस्त्यावरून भरधाव वेगाने धावत आले. त्यातील एका गुराने चालत असलेल्या महिलेला पाठीमागून जोरदार मुसंडी मारली. धडक बसताच महिला बाजूला फेकली गेली. अचानक घडलेल्या या प्रकाराने बाजारपेठेत एकच घबराट उडाली. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमी महिलेला मदत करत पुढील उपचारासाठी दाखल केले.

उनाड गुरांचा प्रश्न कायम; नगरपालिकेच्या कारभारावर संताप
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्लीबोळांमध्ये मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. रस्त्याच्या मधोमध ठिय्या मारून बसणारी आणि अचानक धावणारी ही गुरे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहेत. सातत्याने तक्रारी करूनही नगरपालिकेकडून या जनावरांचा ठोस बंदोबस्त केला जात नसल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भविष्यात असा मोठा अपघात टाळण्यासाठी पालिकेने तातडीने मोहीम राबवून या उनाड गुरांना पकडून कोंडवाड्यात बंद करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.













