Koyna Earthquake: कोयना परिसरात भूकंपाचे ५ सौम्य धक्के; रिष्टर स्केलवर २.१ ते २.५ तीव्रतेची नोंद

Koyna Earthquake: कोयना परिसरात भूकंपाचे ५ सौम्य धक्के; रिष्टर स्केलवर २.१ ते २.५ तीव्रतेची नोंद

पाटण तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवघ्या चार तासांत पाच धक्के; कोयना धरण व परिसरातील बांधकामे सुरक्षित, कोणतीही हानी नाही.

Koyna Earthquake News समोर येत असून, महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरण परिसरात सोमवारी मध्यरात्री १२.३० ते मंगळवारी पहाटे ४ या अवघ्या चार तासांच्या कालावधीत भूकंपाचे पाच सौम्य धक्के बसले आहेत. पाटण (जि. सातारा) तालुक्यातील या भागात रिष्टर स्केलवर २.१ ते २.५ दरम्यान तीव्रतेची नोंद झाली आहे. हे सर्व धक्के अतिशय सौम्य स्वरूपाचे असल्याने स्थानिक नागरिकांना ते जाणवले नाहीत.

सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास २.१ तीव्रतेचा पहिला झटका नोंदवला गेला. त्यानंतर १.३० वाजता २.३ तीव्रतेचा दुसरा धक्का बसला. पहाटे ३.१५ वाजता २.२ तीव्रतेचा, ३.३० वाजता (अवघ्या १५ मिनिटांनी) २.५ तीव्रतेचा आणि पहाटे ४ वाजता २.१ तीव्रतेचा पाचवा धक्का नोंदवला गेला. या सर्व भूकंपांचे केंद्र सातारा शहरापासून सुमारे ५० ते ५२ किलोमीटर अंतरावर असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोयना धरण किंवा परिसरातील कोणत्याही सरकारी व खाजगी बांधकामाला कसलीही हानी झालेली नाही. तसेच पाटण तालुक्यातही कुठेही पडझड किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तरीही, ऐन गणेशोत्सवाच्या काळात एकाच रात्रीत पाच धक्के बसल्याची बातमी समोर आल्यामुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Radhakrushna patapedhi

भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून कोयना धरण परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. धरणाच्या निर्मितीपासून आतापर्यंत या भागात लहान-मोठ्या भूकंपांचे असंख्य धक्के नोंदवले गेले आहेत. यातील बहुतांश धक्के अत्यंत सौम्य असतात. सामान्यतः ३ रिष्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे धक्केच नागरिकांना प्रत्यक्ष जाणवतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.